नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने
किमान तीन झाडांचे रोपन करुन संगोपन करावे
जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांचे आवाहन

0

जालना, दि 5 – सातत्याने वाढणाऱ्या प्रदुषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असुन हे प्रदुषण रोखुन पर्यावरणाचा समतोल राखला जावा.तसेच नैसर्गिरित्या ऑक्सिजनची अधिक प्रमाणात निर्मिती व्हावी, यादृष्टीकोनातुन जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने किमान तीन झाडे लावुन त्याचे संगोपन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिंदखेडा राजा चौफुली येथे वनीकरण विभागाच्या वनउद्यान येथे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी श्रीमती पुष्पा पवार, वनपरीक्षेत्र अधिकारी श्रीकांत इटलोड, वनपाल सर्वश्री बारकुले, श्री पचलोरे, श्री राठोड, वरसंरक्षक सर्वश्री श्री कुमावत, श्री दांडगे, श्री मुटके, श्री तेलग्रे, श्री मांटे, श्री पाटील, श्री सोडगीर, श्री हिरेकर, श्रीमती जाधव, श्री भावले, आस्मा सय्यद, श्री गुसिंगे आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, कोरोनासारख्या महामारीमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सर्वांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे नैसर्गिकरीत्या प्राणवायूची निर्मिती करणाऱ्या वृक्षांचे महत्त्व आपण सर्वांनी जाणले आहे. वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मागे किमान तीन झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे यासाठी वृक्षलागवड कार्यक्रम संपूर्ण मराठवाडा विभागात राबविण्याबाबत विभागीय आयुक्तांनी सुचना केलेल्या असुन जालना जिल्ह्यात यावर्षी पाऊस वेळेवर असल्याने लोकसहभागातुन वृक्ष लागवड करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण विभागांतर्गत घनवन प्रकल्पाचा पहिला टप्पा राबविण्यात आला असुन अत्यंत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वृक्षांची जोपासना करण्यात आली आहे. घनवन प्रकल्पाचा दुसरा टप्पा यावर्षी राबविण्यात येत असल्याचे सांगत नैसर्गिक पद्धतीने ऑक्सिजन निर्मितीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने प्रत्येकी तीन झाडांचे रोपण करुन त्याचे संगोपन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केले.
वृक्षारोपणानंतर गतवर्षी वन विभागामार्फत करण्यात आलेल्या घनदाट वृक्ष लागवडीची जिल्हाधिकाऱ्यांनी पहाणी केली घनवनाच्या कामाबाबत वन विभागाचे कौतुक केले याच धर्तीवर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात घनवनाचा प्रयोग राबविण्यात येऊन वृक्ष आच्छादन वाढविण्याच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी सुचनाही केल्या.
जालना जिल्ह्यास 60 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले असुन या अभियानांतर्गत प्रामुख्याने नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्राच्या हद्दीतील मोकळ्या जागा पडीक जमिनी शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी मोठया प्रमाणावर वृक्षारोपण करण्यांत येणार असुन वन विभागामार्फत या वर्षी जिह्यात 1.25 हेक्टर क्षेत्रावर नगरपालिका व जिल्हा परिषदेसह 5 ठिकाणी घनदाट वृक्षलागवड करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती पुष्पा पवार यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.


- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.