म्युकरमायकोसीस बरा होऊ शकतो त्वरीत उपचार घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

0

यवतमाळ, दि. 22 : म्युकरमायकोसीस हा एक जलद पसरणारा बुरशीचा रोग असून मुख्यत: नाक, डोळे आणि मेंदूला बाधित करतो. या रोगावर वेळीच उपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र उपचार करण्यास टाळाटाळ केल्यास रुग्णाचा डोळा, दृष्टी किंवा जीव जाण्याचासुध्दा धोका असतो. त्यामुळे म्युकरमायकोसीसची लक्षणे आढळल्यास त्वरीत उपचार घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
म्युकरमायकोसीसची लक्षणे : या रोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे आहे. चेह-याचे स्नायू दुखणे, चेह-यावर बधिरपणा येणे, अर्धशिशी (डोक्याची एक बाजू दुखणे), नाक चोंदणे, नाकावर सूज येणे, एका नाकपुडीतून रक्तस्त्राव, काळपट स्त्राव येणे, चेहरा अथवा डोळ्यावर सूज येणे, एक पापणी अर्धी बंद होणे, डोळा दुखणे, वरच्या जबड्याचे दात दुखणे किंवा हलू लागणे, अस्पष्ट दिसणे, ताप येणे.
काय करावे (प्रतिबंधात्मक उपाय) : रक्तातील साखरेवर काटेकोरपणे नियंत्रण ठेवणे, कान, नाक, घसा, नेत्र व दंत तज्ज्ञाकडून एका आठवड्यानंतर तपासणी करणे, वरील लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करणे, डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा जास्त दिवस स्टिरॉईड न घेणे, टूथब्रश / मास्क वरचेवर बदलणे, दिवसातून एकदा गुळण्या करणे, वैयक्तिक व परिसरातील स्वच्छता ठेवणे, जमिनीखाली लागणा-या भाज्या नीट स्वच्छ धुवून खाव्यात. मातीत काम करतांना व खतांचा वापर करतांना पूर्ण बाह्यांचा शर्ट, फुलपॅन्ट, हातात ग्लोव्हज घालावे. तसेच नाकातोंडावर मास्क घालावा.
हे करू नये : छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. घरगुती उपायांचा पर्याय निवडू नये. वैद्यकीय सल्ल्यानेच स्टिरॉईड व इतर औषधांचे सेवन करावे.
या आजाराबद्दल जागरुक राहून काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरीत उपचार घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
०००००००

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.