भज गोविंद भज गोपालच्या गजरात श्री. आनंदी स्वामी महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात

0

कोरोनामुळे यात्रौत्सव रद्द, पारंपरिक सोहळा साजरा

जालना, (गणेश लोखंडे) -जालना जिल्ह्याचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री. आनंदी स्वामी महाराजांचा आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा कोरोनाचे नियम पाळून उत्साहात साजरा झाला. मंगळवारी पहाटे तीन वाजता पालखी मंदिरातून निघताच भज गोविंद भज गोपालच्या गजराने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. गतवर्षी प्रमाणे यंदाही कोरोनामुळे पारंपरिक कार्यक्रम वगळता यात्रा तसेच इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. जुना जालना भागात सुमारे तीनशे वर्ष जुना श्री.आनंदी स्वामींचा मठ आहे. अत्यंत जागृत  मठ म्हणून याची ओळख आहे.येथील लाकडी बांधकाम अत्यंत सुबक असून नजरेत भरते. आषाढ महिन्यात साजरा होणारा हा सर्वात मोठा उत्सव असून, दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. यंदा 13 जुलै पासून उत्सव सुरू झाला. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे स्वामींच्या समाधीला महाभिषेक व मानाचे पाच अभंग म्हणून तीन वाजताच सजविलेल्या रथातून पालखी मिरवणूक निघाली. भाविकांचा अपार उत्साह यावेळी दिसून आला. कचेरी रोड, गणपती गल्‍ली, शास्त्री मोहल्‍ला,माळीपुरा, जामा मशीद परिसर, कसबा, बरवार गल्‍ली मार्गे आनंदी स्वामी गल्‍लीतून पालखी पुन्हा मंदिरात आली. कोरोनामुळे पालखी रस्त्यात कोठेच थांबली नाही.भाविकांनाही धावते दर्शन घेऊन समाधान मानावे लागले. यावेळी संस्थानचे विश्‍वस्त रमेशबुवा ढोले यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
14 तास चालणारा सोहळा अवघ्या एका तासात-आनंदी स्वामी महाराजांचा पालखी सोहळा सकाळी साडेआठ वाजता मंदिरातून निघाल्यावर पुन्हा मंदिरात पोहचण्यासाठी 12 ते 14 तास लागतात. विशेष म्हणजे सर्व पालखी खांद्यावर मिरवली जाते. मात्र दोन वर्षांपासून कोरोनाच्या धास्तीने सोहळा रथातून काढण्यात येत आहे. त्यामुळे 14 तास चालणारा अपूर्व असा पालखी सोहळा अवघ्या एका तासांत पूर्ण होत आहे.
पालखीसाठी विशेष सजावट-पालखी ज्या रथातून मिरवण्यात आली. त्या रथाला आकर्षक अशा विविध फुलांनी सजविण्यात आले होते. सजविलेल्या रथातून निघालेल्या पालखीने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. भज गोविंद भज गोपाल स्वामी आनंदी दीन दयाळच्या गगनभेदी घोषणांनी वातावरण भक्‍तीमय झाले होते.
पालखीवर पुष्पवृष्टी-पालखी थांबणार नसल्याने ठिकठिकाणी भाविकांनी पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत केले. कचेरी रोडी, गणपती गल्‍ली, विठ्ठल मंदिर, गांधी चमन आदी भागात पालखीवर जोददार पुष्पवृष्टी करण्यात आली. नगर पालिकेच्या वतीने पालखीसोबत निर्माल्य संकलन करण्यासाठी पाच घंटा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
पारंपरिक कसरती यंदाही रद्द-आनंदी स्वामी पालखीत गवळी समाजाच्या वतीने विविध शारीरिक कसरती, मल्‍लखांब, लेझिम आदी चित्तथराथरक प्रात्यक्षिके सादर केली जातात. गतवर्षी प्रमाणे यंदाही कोणत्याच कसरती,पावल्या, लेझिम पथक दिसून आले नाही.

- Advertisement -

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.