स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत
मातंग समाजाला न्याय देणार- आ.गोरंट्याल

0

जालना: जालना शहरातील विकासासाठी आपण सातत्याने पुढाकार घेत असल्याने समस्त जनता आपल्याला पाठबळ देत आहे, आगामी नगर पालिकेच्या निवडणुकीत मातंग समाजाला न्याय देण्याची आपली भूमिका राहणार आहे, असे प्रतिपादन आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज येथे केले.
लहूशस्त्र सेना या सामाजिक संघटनेच्या अकराव्या वर्धापनदिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित कोवीड19 जनजागृती कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक नेते भारत जाधव हे यावेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कारके, सामाजिक कार्यकर्ते कैलास पाजगे,विलास साबळे, लेखक व विचारवंत प्रा. डॉ. विजय कुमठेकर, नगरसेविका संगिता पांजगे,सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कारके आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार गोरंट्याल पुढे म्हणाले की, लहूशस्त्र सेनेचे अध्यक्ष संजय गायकवाड हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे सामाजिक कार्य आपण जवळून बघत आहोत, आपण गतवर्षी कोवीड महामारीच्या काळात घरात बसलो नाही, गोरगरीब जनतेला आधार दिला, अनेकांना मदत केली,सेवा केली. कोवीडच्या काळात जनतेला वाऱ्यावर सोडले नाही, आपण सातत्याने जनतेच्या हितासाठी झटत असल्याने जनता आपल्यावर प्रेम करते. आगामी नगर पालिका निवडणुकीत मातंग समाजाला निश्चितपणे न्याय देण्याची आपली भूमिका राहणार असल्याचे आमदार गोरंट्याल यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलतांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी
मातंग समाजाला सर्व राजकीय पक्ष दूर सारीत असल्याचे सांगून सामाजिक संघटना ह्या कौशल्याने चालवायच्या असतात. उपेक्षित समाजातील विचारवंत पुढे आले तरच समाजाला विकासाचे मार्ग सापडतात, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समाजातील विचारवंत व नेतेमंडळींनी मंथन करावे, असे आवाहन करून वंचित बहुजन आघाडी मातंग समाजाचा सन्मान करील, असेही ते म्हणाले.
सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कारके यांनी यावेळी बोलतांना अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची उंची मोठी आहे, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे असे सागतांना संजय गायकवाड यांच्यासारख्या धडाडीच्या तरुण नेत्यास समाजाने पाठबळ द्यावे, असे आवाहनही केले.
यावेळी बोलतांना लेखक व विचारवंत प्रा. डॉ. विजय कुमठेकर म्हणाले की, आज मातंग समाज उपेक्षित जीवन जगत आहे, समाजिक कार्यकर्ते पोटतिडकीने सामाजिक कार्य करीत असले तरी त्यांना म्हणावे तेवढे यश मिळत नाही, तरूण हेच सामाजिक क्रांती घडवून आणू शकतात, महापुरुषांचा विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तरूणावर आहे, लहूशस्त्र सेनेच्या माध्यमातून हे कार्य होत असून तरूणांनी या संघटनेचे अध्यक्ष संजय गायकवाड यांना बळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास साबळे यांनीही मातंग समाजातील प्रश्न उपस्थित करून मातंग समाजाने संघटित होण्याची गरज विषद केली.
लहूशस्त्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजय गायकवाड यांनी मातंग समाजाला स्वंतत्र आरक्षण देण्याच्या मागणीचा पुनरूच्चार केला. मातंग समाजाकडे मत आहे मात्र पत नाही, मातंग समाज संघटित झाल्याशिवाय समाजाला विकासाचा मार्ग सापडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करतांना भारत जाधव यांनी मातंग समाज संघटित नसल्याने सर्वच क्षेत्रात दुर्लक्षित आहे, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते पोटतिडकीने सामाजिक कार्य करतात, मात्र त्यांना अपेक्षित असे पाठबळ मिळत नसल्याने त्यांना निराश व्हावे लागते, संजय गायकवाड यांच्या सारख्या धडपड करणाऱ्या आक्रमक नेतृत्वाला समाजाने बळ द्यावे, असे आवाहनही केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. करुणा नामवाड यांनी लहूशस्त्र सेनेत प्रवेश केला, त्यांची लहूशस्त्र सेनेच्या महिला प्रदेशाध्यक्षापदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लहूशस्त्र सेनेचे मराठवाडा संघटक प्रा. हंसराज मोरे यांनी केले, संचालन लहूशस्त्र सेनेचे प्रदेशाध्यक्ष बंडूभाऊ डोईफोडे यांनी केले तर मराठवाडा उपाध्यक्ष दीपक गायकवाड यांनी आभार मानले. या नंतर दीपक गायकवाड यांच्या क्रांतीचं वादळ हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी लहूशस्त्र सेनेचे जिल्हाध्यक्ष राम ससाने, अनिल साळवे, रणजित रत्नपारखे, मनोज गुढेकर, शाम सराटे, राधाकिशन डोईफोडे, लखन कांबळे, मारोती कांबळे, महादेव घोडे, नितीन बरसे,बाबासाहेब कासार, शीलाबाई गायकवाड, शोभा पाटोळे, सिंधुबाई जाधव, अंजनाबाई शिंदे, राहुल कारके,राम भालेराव, संतोष गुढेकर, संजय पाटोळे, ललित कुचेकर,अशोक जाधव, अशोक सोनोने, अशोक म्हसके, सुनील ससाने, नामदेव सुरडकर,गजानन गायकवाड, सुनील काकफळे, अनिल सुरडकर, गजानन इच्चे यांच्या सह लहूशस्त्र सेनेचे कार्यकर्ते, महीला उपस्थित होत्या.

- Advertisement -

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.