शिवराज नारियलवाले यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील सर्व दोषींचे निलंबन करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा

0

प्रविण दरेकरांनी पोलीस महानिरीक्षकांची भेट घेऊन केली मागणी

औरंगाबाद दि.२९ मे : राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्वपूर्ण काम पार पाडणाऱ्या पोलीस दलाबद्दल नितांत आदर आहे. परंतु, पोलीस दलाचे अधिकार वापरून कायदा हातात घेणाऱ्या अपप्रवृत्तीना वेळीच लगाम घालावा, सर्व दोषींना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, जातीवाचक शिवीगाळीच्या कलमाचाही त्यात समावेश करावा, अशी मागणी आज दरेकर यांनी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे प्रत्यक्ष भेटून केली.
जालना येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले हे दीपक हॉस्पिटलमध्ये बहिणीला उपचारासाठी घेऊन गेले असताना त्या ठिकाणी गवळी समाजाच्या एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला होता आणि त्यामुळे तेथे काही लोक धुडगूस घालत होते.
तेथेच उपस्थित असलेले काही पोलीस गवळी समाजाबद्दल अतिशय अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करीत होते. शिवराज नारियलवाले यांनी पोलिसांची ही शिवीगाळ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली होती. त्याचा राग मनात धरून शिवराज नारियलवाले यांना 9 एप्रिल, 2021 ला गणवेशातील 6 आणि गणवेशात नसलेले 2 अशा आठ पोलिसांनी घेरून लाठ्यांनी अमानुष व बेदम मारहाण केली होती. या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. आतापर्यंत. एका पोलीस निरीक्षकासह ४ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

समाजमाध्यमात प्रकार उघडकीस येण्यापूर्वी स्वतःहून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी पार न पाडणाऱ्या जालना पोलीस अधीक्षकांचा लेखी खुलासा घ्या औरंगाबादच्या आय.जी. याना दिलेल्या पत्रात दरेकर यांनी जालना पोलीस अधीक्षक यांच्यावरही ठपका ठेवला आहे. "समाजमाध्यमात हा प्रकार उघडकीस येण्यापूर्वी औरंगाबाद परिक्षेत्रातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना या अमानुष मारहाणीची कल्पना असताना त्यांनी स्वतःहून संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी पार पाडण्यात अक्षम्य कसूर केली असून कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याबाबत त्यांच्याविरुद्ध देखील शिस्तभंगाची कारवाई होणे गरजेचे आहे," अशी भावना व्यक्त करून दरेकर यांनी जालना पोलीस अधीक्षक यांच्याकडून याबाबतचा लेखी।खुलासा घ्यावा, अशी मागणी केली आहे. या पत्रात दरेकर यांनी हे लक्षात आणून दिले की, समाजमाध्यमांमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आणि जनतेचा असंतोष वाढल्यानंतर, दबाव आल्यानंतर पोलीस दलाला कारवाई करणे 'भाग' पडले आहे. ही कारवाई देखील त्यांनी पूर्णपणे केलेली नाही. कारण, केलेल्या कारवाईतून काही अधिकारी व पोलिसांना पाठीशी घालण्यात आल्याचे दिसून येते. याच पत्रात दरेकर यांनी "किमान आता तरी पोलीस दलाने कुणालाही पाठीशी न घालता सर्व संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करून या घटनेमुळे पोलीस दलाची आणि शासनाची मान खाली गेल्याची जाणीव ठेवून मागणी केल्यानुसार कार्यवाही कराल व दोषींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात कोणतीही हयगय करणार नाही, असा विश्वासही आय.जी. यांच्याबद्दल व्यक्त केला आहे. एकूणच या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला पत्र लिहिल्यानंतर आणि दरेकर यांनी आय.जी. यांची भेट घेतल्यानंतर पोलीस दलावर कारवाई करण्याबाबत दबाव वाढला आहे.

- Advertisement -

दरेकरांनी घेतली शिवराज नारीयलवाले यांची भेट

औरंगाबादच्या आय.जी. याना भेटण्यापूर्वी प्रविण दरेकर यांनी जबर मारहाण झालेल्या शिवराज नारीयलवाले यांच्या जालना येथील घरी जाऊन त्यांची विचारपूसही केली. यावेळी माझा पक्ष, आमचे पक्षाचे नेते आणि माझा समाज माझ्या पाठीशी संकटाच्या काळात पाठीशी उभे राहतील असा विश्वास होता आणि त्याची प्रचिती येत आहे, अशा भावना शिवराज नारीयलवाले यांनी व्यक्त केल्या. यावेळी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या जालना येथील पदाधिकाऱ्यांनी गवळी समाजाला जातीवाचक शिवीगाळ करून याच समाजाच्या तरुणाला जबर मारहाण करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरवडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या निलंबनाची मागणी दरेकर यांच्याकडे केली. काही वेळातच औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेणार असून त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहे, त्यांच्याकडे मागण्याही करणार आहे, त्यावेळी आपण गवळी समाजाच्या मांडलेल्या भावनाही त्यांच्या कानावर घालेन असे आश्वासन प्रविण दरेकर यांनी देताना कुणालाही लहर आली आणि सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्याला लाथा, बुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारहाण केली, हे आम्ही खपवून घेणार नाही, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पी.आय.महाजन याना निलंबित केल्याशिवाय आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही दरेकर यांनी।दिला आहे.


दरेकरांनी आय.जी.यांच्याकडे केल्या या मागण्या
1) व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मारहाण करणारे स्पष्ट दिसत आहेत, तो महत्वाचा पुरावा आहे. परंतु, या प्रकरणात केवळ 5 पोलिसांना निलंबित केले. उर्वरित 3 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तत्काळ करावी.
2) केवळ निलंबनाची कारवाई करून चालणार नाही तर या सर्वांविरुद्ध फौजदारी गुन्हा तातडीने दाखल करावा.
3) रुग्णालयात एका विशिष्ट समाजाविरुद्ध अपशब्द वापरल्याबद्दलच्या गुन्ह्याचा देखील त्यात समावेश करावा.
4) संबंधित पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे जबाबदार अधिकारी म्हणून तेव्हढेच दोषी आहेत. त्यांना देखील तत्काळ निलंबित करावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
5) फौजदारी गुन्ह्याची कारवाई आणि विभागीय चौकशीची कारवाई एकसमयाव्यच्छदेकरून (symalteneously) करावी.
6) या मारहाणीत मारहाण करणाऱ्या पोलिसांव्यतिरिक्त अन्य व्यक्ती सामील असल्यास गुन्ह्यात त्यांचा देखील आरोपी म्हणून समावेश करावा.
7) समाजमाध्यमात हा प्रकार उघडकीस येण्यापूर्वी औरंगाबाद परिक्षेत्रातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना या अमानुष मारहाणीची माहिती असतानाही संबंधित पोलीस अधीक्षक यांनी स्वतःहून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी का पार पाडली नाही, याबाबतचा लेखी खुलासा त्यांच्याकडून घेण्यात यावा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.