पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचा अवलंब व्हावा – पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड

0

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला

नवी दिल्ली :महाराष्ट्राला जैवविविधतेचा खजिना असलेल्या सह्याद्री पर्वत रांगा, समुद्र किनारे, नद्या, जंगल, अभयारण्य आदी पर्यावरणाचा समृध्द ठेवा लाभला आहे. बदलत्या काळात या पर्यावरणासमोर निर्माण झालेली आव्हाने दूर करण्यासाठी जनसहभागातून पर्यावरण पूरक शाश्वत विकासाचा अवलंब व्हावा,असे मत पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी आज व्यक्त केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेतमहाराष्ट्राची पर्यावरण समृध्दी आणि आव्हानेया विषयावर३६वे पुष्पगुंफतानाश्री.गायकवाड बोलत होते.

जैवविविधता असणारा पश्चिम घाटअर्थकारणाला गती देणारे व पर्यावरणाला समृध्द करणारे समुद्र किनारे, जमिनीखाली असलेली खनीजरूपी संपत्ती, नद्यांनी व त्यांच्या खोऱ्यांनी समृध्द केलेले परिसर,वैविध्यपूर्ण वृक्षांनी नटलेली वनराई ,जंगले आणि प्राणी-पक्षांचा अधिवास असणारे अभयारण्य आदींनी महाराष्ट्राचे पर्यावरण समृध्द केले आहे.बदलत्या  काळात राज्यातील या समृध्द पर्यावरणासमोर आव्हानेही उभी राहिली आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी पर्यावरण स्नेही शाश्वत विकासाचे सूत्र अवलंबून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे  श्री. गायकवाड यांनी सांगितले.

जगात जैवविविधतेची ३४ संवेदनशील ठिकाणे असून महाराष्ट्रातील पश्चिमघाटाचा यात समावेश करण्यात आला आहे. तापी, नर्मदा, गोदावरी, भिमा, कृष्णा, कोयना, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा,  हिरण्यकेशी, घटप्रभा, तिलारी या सह्याद्री पर्वत रांगांतील अर्थात पश्चिम घाटातील नद्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जैवविवधता आढळते. राज्याच्या विदर्भ भागातही पर्वत रांगा व यात उगम पावणाऱ्या नद्या आणि पैनगंगा, वैनगंगा आदी नद्यांची खोरे आहेत. या नद्या पुढे गोदावरीला जावून मिळतात. राज्यातील नद्या समुद्राला व बंगालच्या उपसागराला मिळतात तशाच त्या शेजारच्या राज्यांनाही पाणी  देतात, असे श्री गायकवाड म्हणाले.

महाराष्ट्रात ५ कोटी वर्षांपूर्वीच्या अग्निज या कठीण खडकाचे आच्छादन आहे. राज्यातील जोरवे,नेवास येथे झालेल्या उत्खननात दीड लाख वर्ष जुन्या मानवी वहिवाटीचा इतिहास सापडला आहे. कोकणात जांभाखडक, लाल माती, घाटमाथ्यावरील काळी माती तसेच तांबळी, वाळूमिश्रीत माती असे वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यही बघायला मिळते. भंडारा, चंद्रपूर येथील जंगलाचा वेगळा प्रकार तसेच उत्तर महाराष्ट्रात जंगलाचे वेगळे रूप दिसून येते. खानदेश, माणदेश, कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य व पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळी जैवविविधता आहे. तेथे नारळी पोफळीची  झाडे आहेत तशी मोहाची झाडेही आहेत. द्राक्ष,केळी,आंबा, संत्री, ऊस आदी फळ राज्याच्या वेगवेगळ्या भागात उत्पादित होतात तसेच  समुद्री व गोडया पाण्यातील मासे अशी सर्व पर्यावरणाची समृध्द परंपराही राज्यात आहे. 

देवराया महाराष्ट्राला लाभलेली महत्त्वाची देणगी

देवांसाठी संरक्षित केलेल्या व वृक्षसंवर्धनाची परंपरा असणाऱ्या देवरायांनी राज्यातील पर्यावरणाला समृध्द केले आहे. पश्चिम घाट व राज्याच्या अन्य भागात लोकांनी देवराया राखल्या व या माध्यमातून त्या-त्या भागातील मूळ वनस्पती, बियाण्यांचे वान जपून ठेवले आहेत. भविष्याच्या जैवविविधतेचा विचार करता मूळ बियाणे व वानांचे केंद्र असणाऱ्या अशा देवराया हा पर्यावरणाचा समृध्द ठेवा असल्याचे श्री. गायकवाड म्हणाले.

- Advertisement -

गडकिल्ल्यांच्यावरील जलसमृध्दी

राज्यातील गड-किल्ल्यांवर पाण्याचा मुबलक साठा आढळतो. हिरवाई, पर्यावरणीय तसेच भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून गड किल्ल्यांवर जल स्त्रोत निर्माण करण्या आले आहे.पाण्याच्या नियोजनातून झालेला हा जलसमृध्‍दीचा उत्तम  प्रयोग राज्याच्या पर्यावरणाचा ठेवा आहे. घाट मार्गाहून खाली उतरून कोकणात प्रवेश केल्यावर तेथेही समुद्र किनाऱ्यावरील हजारो वर्षांपुर्वीची बंदरे आढळतात ही बंदरे म्हणजे आपली समृध्द वहिवाट आहे. राज्यातमोठ्या प्रमाणात धरणं बांधण्यात आली व यातून सिंचन व वीज निर्मिती झाली. राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात  खनीज संपत्तीही असून  येथील पर्यावरणाला खनीजांनीही समृध्दी प्रदान केली आहे.

पर्यटनाला उत्तम संधी

धार्मिक पर्यटन, समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन, जंगल आणि अभयारण्य, धरण, तलावांच्या माध्यमातून राज्यात पर्यटनाला उत्तम संधी असून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत येथे बाजारपेठा निर्माण होवू शकतात . पर्यावरण पुरक विकास केला तर राज्यातील पर्यटन विकासालाही पोषक वातावरण मिळेल असे त्यांनी सांगितले.

पर्यावरणासमोरील आव्हाने

राज्यात एकीकडेपाण्याचे दुर्भिक्ष्य तर दुसरीकडे अतिरीक्त पाणी वापराने निर्माण झालेले प्रश्नही दिसून येतात.सिंचनाखाली असणाऱ्या भागात मोठया प्रमाणात अतिरीक्त पाणी वापर झाला परिणामी जमीनीवर मोठ्या प्रमाणात क्षारांचा थर निर्माण झाला. दुसरीकडे पाण्या अभावी राज्यातील काही गावांना टँकरने पाणी पोहचवावे लागते. ही विसंगती काही प्रमाणात निसर्गत: असली तरी पाण्याचे सुयोग्य नियोजन करून हा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिरीक्त पाणी, रासायनिक खतांचा वापर यामुळे मातीचे प्रदूषण झाले. त्यातून मानव आणि जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करता पर्यावरण पूरक शेती करण्याची शेतीत सेंद्रिय खतांचा ,ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर  होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जवळपास ३० मोठी शहर आणि ३०० छोट्या शहरांमध्ये रासायनिक उद्योगांतून बाहेर पडणारे पाणी, नागरी मैला, सांडपाणी हे नदी व तलावात सोडल्याने जलस्त्रोतांचे पाणी प्रदूषित होत असल्याची समस्या निर्माण झाली आहे. राज्यात वायु प्रदूषण ध्वनी प्रदूषणाचेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

पर्यावरणासमोरील या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी समाजाने बदलण्याची गरज आहे. शासन प्रशासनासोबतच जनतेने पर्यावरण पूरक शाश्वत विकासाच्यादिशेने प्रयत्न करून राज्यासमोरील पर्यावरणाची आव्हाने दूर करण्यात सहभागी झाले पाहिजे. शेती निती तयार करून तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून उद्योगाप्रमाणे शेतीसाठी याचा वापर करण्याच्यादिशेने कार्य करावे लागेल. अतिरिक्त पाणी वापर टाळावा लागेल. हे सर्व करत असताना शाश्वत स्वरूपाची साधने वापरून दीर्घ काल टिकतील व विकासाला पूरक ठरतील असे रचनात्मक कार्य करावे लागेल.येणाऱ्या पिढ्यांना महाराष्ट्राचा अभिमान वाटावा येथील पर्यावरण जपण्याची प्रेरणा देशाने घ्यावी असे कार्य महाराष्ट्रातून घडावे, अशी अपेक्षाही श्री गायकवाड यांनी यावेळी  व्यक्त केली.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.