क्षणोक्षणी ईश्वराची जाणीव ठेवून स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करावे-सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

0

क्षणोक्षणी ईश्वराची जाणीव ठेवून स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करावे असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी व्हर्च्युअल रुपात आयोजित निरंकारी संत समागमामध्ये जगभरातील लाखोंच्या संख्येने जुडलेल्या निरंकारी भक्तगणांना व प्रभु-प्रेमी सज्जनांना संबोधित करताना व्यक्त केले. संत निरंकारी मिशनच्या वेबसाईट द्वारे या समागमाचे थेट प्रसारण करण्यात आले. उल्लेखनीय आहे, की मागील २३ मे पासून सद्गुरु माता सुदीक्षाजी आठवड्यातून तीन वेळा आपले पावन दर्शन व आशीर्वाद व्हर्च्युअल संत समागमांच्या माध्यमातून प्रदान करत आहेत. सद्गुरु माताजी यांनी एका उदाहरणाद्वारे समजावले, की जर आपल्या पापणीचा केस डोळ्यात गेला तर डोळ्याला खूप त्रास होतो. प्रयत्न करुन तो केस काढला तरी काही काळ डोळ्याची चुरचूर चालूच राहते. अशाच प्रकारे जेव्हा आपण एखाद्याला कठोर वचन बोलतो आणि नंतर जरी त्याची माफी मागीतली तरी त्या व्यक्तीच्या मनाला झालेली वेदना दूर होत नाही. म्हणून आपण गोड आणि प्रिय वाणीने प्रत्येकाच्या हृदयामध्ये सकारात्मक जागा तयार करायची आहे. या समागमामध्ये महाराष्ट्रातील काही वक्त्‌यांनाही आपले भाव व्यक्त करण्याची संधी मिळाली.  दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, तामिळनाडु, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील मिशनच्या सर्व क्षेत्रीय शाखांनी मिळून आयोजित केलेल्या व्हर्च्युअल संत समागमामध्ये सद्गुरु माताजींनी प्रतिपादन केले, की आत्मविश्लेषण आणि आत्मपरीक्षण करत स्वत:मध्ये सुधारणा घडवून मानवतेसाठी आपण वरदान बनावे. सद्गुरू माता सुदीक्षाजी म्हणाल्या, की जेव्हा आपण स्वत:च्या सुधारणेवर लक्ष केंद्रीत करु तेव्हा इतरांच्या उणिवा पाहण्यासाठी आमच्याकडे वेळच उरणार नाही. लहान-सहान गोष्टींवर जेव्हा आपण संवेदनशील होऊ तेव्हा आमच्या मुखातून असे कोणतेही बोल निघणार नाहीत जे इतरांचे मन दुखवतील. आमचे दैनंदिन जीवन असो अथवा एखादा सेवेचा प्रसंग; जेव्हा आपण कोणतीही खात्री न करता एखादी गोष्ट मानू लागतो तेव्हा त्यातून मुलभूत तथ्य हरवलेले असते. परिणामी एखाद्याचे मन दुखावले जाते. तेव्हा एका बाजूला स्वत:ला सजग ठेवून कोणतीही जबाबदारी इमाने-इतबारे पार पाडायची आहे, जेणेकरुन आपण प्रत्येकाला आनंदच देऊ शकू. माता सुदीक्षाजींनी पुढे सांगितले, की संतांनी, गुरु-पीर-पैगंबरांनी युगानुयुगे जो मार्ग दाखविला आहे तोच सच्चा मार्ग आहे. त्याच मार्गावर आपण चालायचे असून संतुलित जीवन जगायचे आहे. आपली परिवार, समाज, देश आणि मानवतेच्या प्रति जी कर्तव्ये आहेत ती यथोचितपणे पार पाडायची आहेत. आमच्यातील वास्तविक कर्तृत्व आणि आमचा स्वभाव यांचा मेळ घालून एक असे चरित्र निर्माण करायचे आहे, ज्यायोगे आपले व्यक्तीत्व उंचावत जाईल. दक्षिण पूर्व आशियायी देश सिंगापूर, हॉंगकॉंग, इंडोनेशिया, जपान, फिलीपाईन्स, मलेशिया आणि थायलँड मधील निरंकारी भक्तांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या व्हर्च्युअल संत समागमामध्ये जगभरातून सहभागी झालेल्या लाखो भक्तगणांना संबोधित करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, की जीवन तेव्हाच यशस्वी जीवन म्हटले जाऊ शकते जेव्हा ते निराकार प्रभुशी नाते जोडून जगले जाते. जागतिक पर्यावरण दिवसाचा उल्लेख करताना सद्गुरु माताजींनी सांगितले, की विधात्याने केलेली प्रकृतीची रचना अतिसुंदर आहे. प्रकृतीच्या या बाह्य सौंदर्याला आणखी झळाळी देण्याचे कार्य तर आपण करायचेच आहे, शिवाय आपल्या आंतरिक पर्यावरणाकडेही लक्ष द्यायचे आहे. आपल्या मनातील प्रदूषण दूर करुन तेही सुंदर करायचे आहे.  जपानमधील सुप्रसिद्ध चेरी ब्लोसम ट्रीचे उदाहरण देताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की त्या झाडांचे महत्व केवळ त्यांना फुले येतात त्या मोसमापर्यंत सीमित नाही. जेव्हा त्यांना फुले येत नाहीत तेव्हा जर आपण ती झाडे तोडून टाकली तर मग झाडच उरणार नाही आणि फुलेही येणार नाहीत. अशाच प्रकारे ईश्वराची आठवण केवळ दु:खाच्या प्रसंगीच न करता जीवनामध्ये सदोदित त्याचे ध्यान आणि महत्व कायम टिकून राहावे. सद्गुरु माताजींनी सिंगापूर, हॉंगकॉंग तसेच संपूर्ण विश्वातून मिशनद्वारे आजच्या असाधारण परिस्थितीमध्ये केल्या जाणार्‍या सेवांचा उल्लेख करुन सेवेची ही भावना अशीच वृद्धींगत होत जावी, अशी शुभकामना व्यक्त केली. केवळ आत्मकेंद्रीत जीवन न जगता आपल्यामुळे इतरांच्या जीवनामध्ये थोडा आनंद निर्माण होईल, असा प्रयत्न करायचा आहे, त्या प्रयत्नामध्ये जुटायचे आहे.शेवटी सद्गुरु माताजींनी हेच सांगितले की, जेव्हा आपण स्थिरतेविषयी बोलत असतो तेव्हा ती स्थिरता एखाद्या पुतळ्यासारखी स्तब्ध असू नये. मनाला नियंत्रित करुन जीवन जगत असतानाच ती स्थिर अवस्था धारण करायची आहे.

- Advertisement -

-संकलन : किरण गरड, जालना.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.